शोधग्राम : माझा अनुभव

शोधग्राम "शोधग्राम", डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी वसवीलेल एक छोटस गाव. गडचिरोली गावापासून १७ की. मी. अंतरावर असलेल एक अभूतपूर्व गाव. आयुष्यात काही माणसांना एकदा तरी भेटता यावे अशी इच्छा असते. माझी तर अस कोणकोणाला भेटायचे त्याची यादीच तयार झाली आहे. माझ्या या यादीमध्ये दोन नाव होती डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग. या दांपात्याबद्दल मी बरच वाचल होत, ऐकल होत. त्यांनी स्थापन केलेली संस्था "सर्च". ही संस्था स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश असा की आदिवासी लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषय जागरुकता निर्माण करणे आणि आरोग्य विषयक सोयी त्यांना उपलब्ध करून देणे. त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. मुक्तामुळे ही संधी मिळाली. गडचिरोली पासून जवळच असलेल एक वेगळच गाव. हमरसत्यावर "शोधग्राम" ची पाटी दिसली आणि तिथून डावीकडे वळले की काही अंतरावरच शोधग्रामचे प्रमुख द्वार दिसते. अतिशय कलात्मक कमान आणि तसाच कलात्मक प्रमुख दरवाजा! या प्रमुख दरवाजातून थोडेसे आत आल्यानंतर एक मोठा चौक आहे. आत येणारा हा रस्ता या परिसराला दोन भागात विभगतो. उजवीकडील भाग हा सगळा रहिवासी भाग आहे आणि डावीकडे दवाखाना, लायब्ररी, हॉस्पिटल असे कामाचे विभाग. येथील बांधकाम अतिशय सुबक आणि साधे पण तरीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ. बंग यांना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यांना सेवाग्राम सारखा साधेपणा या ठिकाणी अपेक्षित होता त्याचप्रमाणे ते म्हणाले माझा आदिवासी इथे आल्यानंतर त्याला, आपण आपल्याच परिसरात असल्यासारखे वाटले पाहिजे. अशा या दोन कल्पनांच्या संगमाचा हा अविष्कार आहे. एकसारखेपणा हे देखील या बांधकामाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्ट या दांपत्याने खूप विचार करून केलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बैठी घरे आहेत. भरपूर झाडे आहेत. या परिसरात मध्यभागी डॉ. बंग यांचे वडील, ठाकूरदास बंग, यांच्या स्मृतीनिमित्त एक स्मृतिचिन्ह म्हणून एक चरखा ठेवलेला आहे. या स्मृतिचिन्हामुळे या जागेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाल्यासारखे वाटते. आम्ही आत आल्यावर इथल्या वातावरणात भरपूर Positive Energy असल्याचे जाणविले. खूपच प्रसन्नता जाणवली. येथील प्रत्येकजण अतिशय हसतमुख आणि नम्र आहे. आपोआपच आपल्यातही एक प्रकारची नम्रता आणि सकारात्मक उत्साह आल्यासारखे वाटते. आम्ही साधारण १२.३० वाजता शोधग्राम मध्ये पोचलो मग जेवण करून डॉ. बंग यांच्या घरी गेलो. डॉ. राणी बंग या बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यांच्या घरात गेल्यावर मला आपल्या मराठी म्हणी किती नेमक्या बनविलेल्या आहेत याची प्रचिती आली. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी." खरोखरच इतक्या साधेपणाने पण उत्तमप्रकारे कस रहाव हे या लोकांकडून शिकाव. अर्धा तास डॉ. बंग यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारुन आम्ही बाहेर पडलो. मग अमृत बंग, डॉ. बंग यांचा मुलगा, याने आयोजित केलेल्या 'निर्माण' या कार्यशाळेत मुक्ता व्यसनमुक्ती आणि मुक्तांगण या विषयावर बोलणार होती. मुक्ताने अतिशय उत्तम प्रकारे या कार्यशाळेतील तरुण-तरुणींना या विषयावर माहिती दिली. रोज संध्याकाळी ६.४५ वाजता इथे प्रार्थना असते. त्या वेळी सर्व शोधग्रामवासी प्रार्थानेला एकत्र येतात. प्रार्थना झाल्यानंतर डॉ. बंग यांनी माझी आणि मुक्ताची सर्व शोधग्राम वासियांना ओळख करून दिली. ज्या प्रकारे त्यांनी आमची ओळख करून दिली मला तर वाटल की आपण खूपच काहीतरी मोठे काम करत आहोत. आपल्यालाच आपले कौतुक वाटते. त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग डॉ. बंग यांच्याबरोबर बराच वेळ घालवायला मिळाला. खूप वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करायला मिळाली. सर्च चा सुरुवातीचा काळ, तेव्हाची आव्हाने, आत्ताची नवीन आव्हाने, एक ना अनेक अशा सर्व गोष्टींवर त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो. सध्याचे सर्च समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे तंबाखूचे व्यसन. या व्यसनाचे सर्वात कमीत कमी वय म्हणजे वय वर्षे ५. इतक्या लहान वयाची मुले तंबाखूचे व्यसन करतात. दुसर्याव दिवशी सर्च चे एक डॉक्टर आम्हाला जवळच्याच एका गावात घेऊन गेले. तिथे आम्ही एका घरात एका बाईंना भेटायला गेलो. आत जाताना एक पाटी वाचली, 'ग्राम आरोग्य सेवा - प्रशिक्षित स्त्री आरोग्यदूत.' या पाटीचा अर्थ आधी लक्षात आला नाही. आत गेल्यावर त्या डॉक्टरांनी एका साध्या नउवारी लुगड नेसलेल्या स्त्रीची ओळख करून दिली, ही स्त्री त्या गावाची आरोग्यदूत आहे. ते म्हणाले गडचिरोलीच्या आसपासच्या जवळजवळ ४० गावात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचे कारण एकतर यांची प्रसुति घरीच होते. त्या वेळेस जर काही त्रास झाला तर बाळ जाण्याची शक्यता असते, तसेच अनेक अंधश्रद्धा आणि चुकीच्या पारंपारीक गोष्टींमुळे बाळाची आणि आईची योग्या प्रकारे काळजी घेतली जात नाही. म्हणून सर्च ने या ४० गावातून ४० बायका निवडल्या, ज्यांना लिहिता वाचता येत होते आणि ज्यांना स्वतःची मुले आहेत. मग या सर्वांना सर्चच्या टीम ने लहान बाळाची हॉस्पिटलमधे जशी काळजी घेतली जाते त्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले. यात त्यांना बाळाचे वजन करणे, बाळाला इन्जेक्शन देणे, शिवाय एखादे बाळ जर बालंपनात गुदमरले असेल तर त्याला कसे वाचवायचे या सर्व गोष्टींचे उत्तम प्रशिक्षण दिले. यांना स्त्री आरोग्यदूत असे म्हणतात. या ४० गावांमधे १९९४ पासून सर्च च्या स्त्री आरोग्यदूत काम करायला लागल्या आणि आजतगायत या ४० आरोग्यदूत सर्च चे हे अनमोल कार्य अविरतपणे करीत आहेत. आज या ४० गावातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ६३% ने कमी झाले आहे. किती मोठे यश आहे हे !!! नंतर आम्ही शोधग्राममधील हॉस्पिटल बघितले. माझ्या आजपर्यंतच्या बघण्यातील हे पहिलेच हॉस्पिटल असे आहे की जे हॉस्पिटल सारखे वाटतच नाही. याची रचनादेखील आदिवसीना केंद्रस्थानी ठेवून केलेली आहे. येथील खोल्या म्हणजे छोट्या छोट्या कुटी आहेत जिथे आदिवासी पेशंट आपल्या नातेवाईकासोबत राहू शकतो. कारण डॉ. बंग याना असे जाणविले की आदिवासी आपला पेशंट हॉस्पिटल मधे ठेवत नाही कारण त्याला असुरक्षित वाटते. पण या सोयीमुळे तो प्रश्नच मिटला. या हॉस्पिटलमधे Pathology Lab, ECG, Sonography, Dental clinic, असे सर्वकाही आहे. त्याचप्रमाणे इथे Planned Surgeries होतात. म्हणजे दर २-३ महिन्यांनी पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणहून डॉक्टर्स इथे येतात आणि हर्निया पासून ते अगदी स्पाइन सर्जरी पर्यंत सगळ्या सर्जरी येथे करतात. खरोखरच आपल्या विचारापालीकडचे हे समाजकार्य आहे. आदिवासींमधे राहून त्यांना काय समस्या आहेत त्या शोधून काढायाच्या आणि मग त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. हे या दांपत्याचे काम खरोखरच निःशब्द करून टाकणारे आहे. या कामात त्यांना साथ देणारी आनंद आणि अमृत ही त्यांची दोन मुले आणि सर्च ची टीम सुद्धा तितक्याच निष्ठेने हे समाजकार्य करते आहे. डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग आणि त्यांची सर्च ची टीम यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा.

Comments

 • Amol R. Pulkanthwar
  Reply

  hello ! umesh jadhav. तुमचा अनुभव वाचला खूप च छान वाटले. मी देखील डॉ अभय बंग विषयी बराच वाचलं आहे.आणि माझी यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. मला यांना खरंच भेटायचं आहे. मला मार्गदर्शन करा plz.
  Amol R. Pulkanthwar
  Degloor, Maharashtra.
  amolpulkanthwar2013@gmail.com

WordPress Image Lightbox