डोळस गांधीवादी
, अर्थतज्ज्ञ, गांधीवादी, प्रा. ठाकूरदास बंग
प्रा. ठाकूरदास बंग यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी क्वचित मिळाली असली तरी त्यांच्या विचारांनी मी आणि माझ्यासारखे अनेक जण प्रेरित झाले आहेत. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेले प्रा. बंग हे उत्तम अर्थतज्ज्ञही होते. त्यांच्या जाण्याने सर्वोदयाचा अस्त झाला आहे. त्यांच्यासारखे लोक असते तर भ्रष्टाचाराचे फोफावलेले रान कापून टाकण्यास मदत झाली असती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ हा झपाटलेपणाचा तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ हा मोठय़ा आव्हानांचा होता. या दोन्ही कालखंडात प्रा. बंग हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेच होते. त्यांनी इतरांना गांधीजींचे विचार सांगण्याआधी स्वत:मध्ये त्याचा अवलंब केला. अशा समाजहितैषीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अवघड आहे.
ज्येष्ठ सर्वोदयी, गांधीवादी विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ प्रा. ठाकूरदास बंग यांच्या निधनाने एक सच्चा गांधीवादी हरपला आहे. अशा विचारांची माणसे मुळातच कमी असताना प्रा. बंग यांच्यासारख्यांचे जाणे मनाला वेदना देणारे ठरते. आजच्या अनेक नेत्यांप्रमाणे किंवा अन्य क्षेत्रांत काम करणा-या लोकांप्रमाणे ते निव्वळ दाखवण्यापुरते गांधीवादी नव्हते तर कट्टर गांधीवादी होते. अभय बंग यांच्यासारखा मुलगा त्यांच्या हातून घडला. डॉ. अभय बंग यांना मी अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगानिमित्त भेटलो आहे. पण, ठाकूरदास बंग यांना भेटण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण, त्यांचा जो अल्प सहवास मिळाला त्यातूनही बरेच काही शिकण्यासारखे होते. शिवाय त्यांचे विचार मी आधीपासूनच ऐकून होतो आणि नंतरही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते ऐकण्याची संधी मला मिळाली. ते प्रसिद्धिपराड्.मुख, इतर गोष्टींपेक्षा विधायक कृती आणि तशाच विचारांचा अंगीकार करणारे होते.
प्रा. ठाकूरदास बंग यांना महात्मा गांधी यांचा दीर्घ सहवास लाभला. त्यांच्याबरोबर अनेक कामे करण्यात आणि समाजहितैषी विचार लोकांमध्ये रुजवण्यात बंग यांचा वाटा मोठा आहे. खादीच्या प्रसारासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणावर काम केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा डांगोरा अनेक जण पिटतात. पण त्यांची मांडणी करणा-या प्रत्येकात त्याचा अंगीकार असतोच, असे नाही. प्रा. ठाकूरदास बंग यांनी इतरांच्या मनावर गांधीजींचे विचार रुजवण्याआधी ते स्वत:च्या मनावर बिंबवले.
आपल्याकडच्या गांधी सूत्रावर नेहरू सूत्राने मात केली. गांधीसूत्र राजकारणातून हरवल्याने सत्तेचे पाश्चिमात्यीकरण झाले, त्यामध्ये भांडवलशाहीला ऊत आला. आपण धर्मनिरपेक्ष नसून सनातन िहदू आहोत, असे महात्मा गांधी सांगत असत. ते धार्मिक नव्हते तर आध्यात्मिक होते. त्यांनी आपल्या विचारांतून एक अर्थकारण मांडले. पण, गांधींचे नाव घेणा-या काँग्रेसने ते समजून घेतले नाही. महात्मा गांधींनी स्वराज्याची हाक देताना अर्थकारणाला साद दिली. त्यांच्या या विचारांचे काम करण्यात प्रा. ठाकूरदास बंग यांच्याप्रमाणेच गंगाप्रसाद अगरवाल, बाळासाहेब भारदे, निर्मला देशपांडे इत्यादींनी आपापल्या पातळ्यांवर काम केले. त्यातूनच सर्वोदयची स्थापना झाली.
प्रा. ठाकूरदास बंग यांना अलीकडेच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला होता. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांच्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय सालस, मृदू आणि ऋजू होते. इतके मोठे कार्य करूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अहंकाराचा कणही नव्हता. आपल्या कामासाठी त्यांनी कधीच प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही.
प्रा. बंग यांचे शैक्षणिक कार्यही देदीप्यमान होते. पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी पाच सुवर्णपदके प्राप्त केली होती. परदेशी विद्यापीठाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. त्यासाठी त्यांना अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी त्यांनी व्हिसा, पासपोर्ट वगरे सगळी तयारीही केली होती. पण, जाण्याआधी महात्मा गांधी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी ‘तेथे जाऊन तू काय करणार आहेस?’ असे गांधीजींनी त्यांना विचारले. त्यावेळी तेथे जाऊन कृषी संशोधन करून पीएच.डी. मिळवणार आहोत, असे प्रा. ठाकूरदास बंग यांनी सांगितले. त्यावर तेथे जाऊन हा अभ्यास करण्यापेक्षा आपल्या देशातील खेडय़ात जाऊन प्रयोग कर, असे गांधीजींनी त्यांना सांगितले. प्रा. ठाकूरदास बंग यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि गांधीजी ज्या झोपडीत होते तेथून बाहेर येताच प्रा. बंग यांनी आपला पासपोर्ट, व्हीसा आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे फाडून टाकली. त्यांच्या जागी दुसरी एखादी व्यक्ती असती तर आपण इतक्या मोठय़ा संशोधनासाठी परदेशात निघालो आहोत तर त्याला गांधीजी नको म्हणत आहेत, या भावनेने ती खट्ट झाली असती. पण, गांधीजींचे विचार आणि त्यांचे शब्द हे प्रा. बंग यांच्यासाठी प्रमाण असल्याने त्यांच्या बाबतीत असे झाले नाही. गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण जीवनाशी तद्रूप होऊन त्यांच्या विचारांशी ते समरस झाले. प्रा. बंग यांच्या आयुष्याला यामुळे वेगळे वळण लाभले.
महात्मा गांधी यांच्यावर आणि त्यांच्या विचारांवर प्रा. ठाकूरदास बंग यांची नितांत श्रद्धा होती. ही अजोड श्रद्धा त्यांनी आयुष्यभर जतन केली. अर्थशास्त्रात त्यांना उत्तम गती होती. गांधीजींच्या विचारातून त्यांनी कृषी आणि ग्रामविकासात अनमोल असे कार्य केले. अर्थशास्त्राची त्यांना चांगली जाण असल्याने माणसाची समृद्धी माणसात राहून शक्य असेल तर ती माणसातच राहून शक्य आहे, हे त्यांना महात्मा गांधी यांच्या उपदेशातून उमगले. सेवाग्राम आणि पवनार या दोन प्रेरणाभूमींशी प्रा. ठाकूरदास बंग एकरूप झाले होते. महात्मा गांधी यांनी ‘हिंद स्वराज्य’ असा शब्द वापरला होता. त्यामधील स्वराज्य हा शब्द कायम ठेवून ठाकूरदास बंग यांनी ‘ग्रामस्वराज्य’ हा शब्द वापरला. स्वराज्य हा शब्द प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, प्रत्येक राज्य, प्रत्येक देश आणि सा-या विश्वाला लागू होतो.
महात्मा गांधी यांच्यानंतर प्रा. ठाकूरदास बंग यांची विनोबांवर श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी भूदानासाठी सारा देश पालथा घातला. या गोष्टीमध्येही त्यांनी अर्थशास्त्राचा आधार घेतला. देशात आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळी प्रा. बंग जयप्रकाश नारायण यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. सर्वोदय मंडळासाठी ते झटले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ हा झपाटलेपणाचा तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ हा मोठय़ा आव्हानांचा होता. या दोन्ही कालखंडात प्रा. बंग हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेच होते. नकळत ते अनेक पिढय़ांचे मार्गदर्शक झाले.
महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची भूमिका घेतली. त्यासाठी मोठा समुदाय निर्माण केला. विनोबांनी त्याचे सूक्ष्मतम आणि सूक्ष्मतर केले. नंतर सत्याग्रहाची कल्पनाच संपली. प्रा. बंग यांनी पुढे विहार संघर्ष समितीची स्थापना केली. आज आपल्या देशात राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिका-यांमध्ये भ्रष्टाचाराचे रान फोफावले आहे ते प्रा. बंग यांच्यासारखे लोक असते तर फोफावले नसते. त्यांचा भ्रष्टाचाराला नेहमीच विरोध होता. सत्तेचे केंद्रीकरण त्यांना मान्य नव्हते. महात्मा गांधी यांच्यावर त्यांची केवळ श्रद्धाच नव्हती तर त्यांचा गांधीवाद डोळस होता. देशातील आणीबाणीला त्यांचा विरोध होता. द्धारकानाथ धड्डा हे बंग यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ होते. पण, तेही प्रा. बंग यांच्याबरोबर होते.
प्रा. बंग हे अतिशय कुशल संघटक होते. केवळ माणसे जोडून चालत नाहीत तर आपलेपणा टिकवला पाहिजे, त्यांचेही होता आले पाहिजे याची पुरेपूर जाण प्रा. बंग यांना होती. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांच्याबरोबर नेहमी चरखा असायचा. वेळ मिळेल त्यावेळी ते चरख्यावर कताई करत असत. हा निर्मोहीपणा त्यांना महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या कृतीप्रेरणेतून मिळाला. त्यांनी आयुष्यभर जनविकासाचे व्रत पाळले. गावविकासाचा त्यांचा प्रयोग अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. आपल्या भोवताली विशेषत: राजकीय क्षेत्रांत बहुतांशी अंधारच दिसत आहे. अशा वेळी त्याच्याशी लढण्याचे बळ देण्याचे काम प्रा. बंग यांच्यासारखी मोजकी माणसे करत असतात. अशा निराशाजनक परिस्थितीशी स्वत: लढण्याचे काम त्यांनी आपल्या परीने केलेच. पण, पुढच्या पिढय़ांसाठीही त्यातून प्रेरणा दिली. शेवटपर्यंत ते अज्ञानी, दुर्बलांसाठी लढत राहिले. त्यांच्या या अथक कामगिरीमुळे त्यांचा विसर पडणे अशक्य आहे.
लेखक : विश्वंभर चौधरी
साभार : prahar.in
Comments