गांधी व संघ
गांधी व संघ : काय भुललासी वरलीया रंगा ?
- डॉ. अभय बंग
‘गांधीवादात दडलेले संघीय प्रतिगामित्व’ ह्या राजीव सानेंच्या लेखाचे दोन भाग करता येतील. लेखाचा बहुतेक भाग गांधीजीवर तेच जुने आरोप आहेत जे गेली शंभर वर्षे गांधी विरोधकांनी केले आहेत. सदानंद मोरेंच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडीय पुस्तकात अशा टीकेबाबत– जी ब-याचदा निंदा व कुचाळक्यांच्या पातळीला पोचायची – विस्तृत चर्चा आहे. जरी सानेंची काही टीका उदारवादी भूमिकेतून प्रामाणिक मतभिन्न्तेमुळे आहे, पण बरीचशी टीका ही अर्धसत्यावर आधारित आहे. उदाहरणार्थ – गांधीजींनी जयप्रकाश नारायणांच्या तरुण पत्नीला ब्रह्मचर्याची शपथ देणे हा गांधीजींचा अतिरेक होता हा आरोप. पती जयप्रकाश विदेशात शिकायला गेल्यावर बिहारच्या गांधीभक्त कुटुंबातली तरुण प्रभावती गांधीजींच्या आश्रमात रहायला आली. गांधीजी व कस्तुरबांनी तिला आपली मुलगी मानले. पुढे तिने आजन्म ब्रह्मचर्य पालनाचा संकल्प करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा गांधीजींनी ‘जयप्रकाशच्या संमतीशिवाय असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही’ असे सांगून घाई न करण्याचा सल्ला तिला दिला. तरी प्रभावतीने संकल्प केलाच. पुढे शिक्षण पूर्ण करुन जयप्रकाश भारतात परतल्यावर गांधीजी त्यांना म्हणाले की ‘तुझ्या संमतीशिवाय प्रभावतीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्याशी विवाह विच्छेद करुन दुसरे लग्न करण्याचा तुला पूर्ण हक्क आहे.’ (जयप्रकाशांनी दुसरे लग्न न करता प्रभावतीचा संकल्प स्वीकारुन आजन्म विवाहित ब्रह्मचर्य स्वीकारले – ही त्यांची थोरवी.) पण यात गांधीजींनी जबर्दस्ती केली किंवा अन्याय केला हे म्हणणे अर्धसत्य सांगून विपर्यास करणे होईल.
ब्रह्मचर्य, अहिंसा, ग्रामस्वराज्य अशा अनेक गंभीर विषयांमागची पूर्ण वैचारिक व तात्विक भूमिका समजून घेऊनच मग योग्य-अयोग्य निर्णय करता येईल. त्याचा एक तुकडा, एक अर्धवट प्रसंग अथवा एक वाक्य धरुन – गांधीजी असे होते बघा, हे म्हणणे म्हणजे एखाद्या कारचा मडगार्ड वेगळा दाखवून तो कसा बेढब आहे किंवा तो स्वतः पळू शकत नाही असे म्हणणे होय. आपल्या मूळ स्थानापासून तोडून केवळ तुकडा पाहिल्यास सुंदर कलाकृतीही विरुप वाटेल.
गांधी विचारांची आजच्या काळात प्रासंगिकता याविषयी भरपूर तात्विक चर्चा गेल्या काही वर्षात अन्य लोकांनी केली असल्याने (सु.श्री. पांढरीपांडे यांचे ‘नवे मन्वंतर – महात्मा गांधींचे हिंदस्वराज्य’, अनुराधा वीरावल्ली यांचे ‘गांधी इन पोलिटिकल थिअरीः ट्रुथ, लॉ, ऍन्ड एक्सपेरिमेंट’) याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज वाटत नाही.
पण राजीव सानेंचा दुसरा मुद्दा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिगामित्वाचे छुपे गुरु महात्मा गांधी आहेत – हा एकदम नवा शोध आहे. त्यासाठी अगदीच तोकडा पुरावा मांडून त्यांनी अचानक तार्किक हनुमान उडी मारली आहे. लोकसत्ताकारांनीही चित्र व चौकटीसह यालाच ठळक केले आहे. या शोधाची नीट चर्चा करणे आवश्यक आहे.
मला अशी शंका येते की संघाची काही बाह्य चिन्हे आणि सेवेचे विविध कार्यक्रम यासोबत संघाची विचार प्रणाली व कार्यपध्दती यांची गल्लत झाल्याने त्याचे मूळ गांधी विचारात आहे असा गैरसमज झाला आहे.
1977 पर्यंत राष्ट्रीय सेवक संघ समाजसेवेची सर्व कामे काटेकोरपणे टाळत होता. 1975 ते 1977 या इमर्जन्सीच्या काळात जेलमधे असतांना संघ नेतृत्वाच्या लक्षात आले की आपल्या केवळ मैदानी कवायती व संघ शाखांच्या कार्यक्रमांचे सामान्य लोकांना काहीही देणेघेणे नसून आपल्या मागे फार लोक उभे झाले नाहीत. संघटनेसाठी सेवेच्या व रचनात्मक कामांची गरज बहुदा तेव्हा त्यांच्या लक्षात आली. 1977 मधे जेलमधून सुटल्यावर तत्कालीन सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस (व कदाचित नानाजी देशमुख) यांच्या पुढाकाराने संघाने लोकसंग्रहासाठी सेवेच्या विविध कार्यक्रमांना सुरवात केली. रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथांनी 3 आक्टोबरच्या लोकसत्तेत म्हटल्याप्रमाणे सेवेचे व पर्यायी समाजाचे कार्यक्रम करु इच्छिणा-या कुणालाही गांधीला टाळता येत नाही इतके कार्य त्यांनी प्रत्येक क्षेत्रात करुन ठेवले आहे. गांधींचे कार्यक्रम – गोसेवा, आदिवासी सेवा, स्वदेशी, गांव चलो, ग्रामोद्योग, खादी, स्वच्छता हे संघ संस्थांना सोयीस्कर व अनुरुप वाटले. संघसंस्थांपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी ते उचलले, वापरले व आपले केले. यासाठी गांधीजींना किंवा संघाला दोष देता येणार नाही. यामुळे काही संघ गांधीवादी होत नाही की गांधी संघाचे छुपे गुरु होत नाहीत. खरा प्रश्न हा की संघाच्या व गांधीच्या मूळ विचार व तत्वांमधे एकरुपता आहे का ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मधील मुख्यालयात एका राष्ट्रीय शिबिराचा प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा दहा-बारा वर्षांपूर्वी मला योग आला. तेथील एकूण वातावरण बघून सरसंघचालक श्री. सुदर्शनजींना मी प्रश्न विचारला – संघातील साधी राहणी, पांढरे धोतर, लुंगी व पांढरा सदरा हा वेश, ब्रह्रचर्याचा आग्रह, हिंदीचा वापर, शाकाहारी जेवण, जेवणापूर्वी म्हटलेले मंत्र – सर्व बघून मला गांधीजींच्या आश्रमाची आठवण आली. पण या बाह्य साम्याखेरीज संघ व गांधी यामधे मूलभूत फरक तुम्हाला काय वाटतो ?
सुदर्शनजी स्पष्ट बोलणारे होते. ते पटकन म्हणाले – दोन फरक आहेत. एक, तुम्ही गांधीवादी सर्व धर्मांना समान मानता व मुस्लीमांचे अतिरेकी लाड करता, आम्ही हिंदूधर्म सर्वात श्रेष्ठ मानतो. दोन, तुम्ही अहिंसेला तत्व मानून अतिरेकी महत्व देता, आम्ही आवश्यक असल्यास हिंसा स्वीकार्य मानतो.
मी त्यांची क्षमा मागून त्यांना अजून एक तिसरा फरक सांगितला. “गांधीजी सत्याला ईश्वर मानायचे. त्यामुळे सत्य त्यांच्यासाठी प्राणाहून प्रिय होते. तुम्ही गरजेनुसार असत्याचाही आधार घेता व गनिमी कावा किंवा चाणक्य नीती म्हणून त्याचे समर्थन करता.”
सत्य, अहिंसा व सर्वधर्म समभाव हे गांधींचे तीन तात्विक मूलाधार होते. ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ – ईश्वर सर्वत्र वसलेला आहे ही ईशावास्य उपनिषदातली व ‘वासुदेवं सर्वमिति’ ही गीतेतली मांडणी त्यांच्या विचार, वृत्ती व आचाराचा गाभा होती. ईश्वर सर्वत्रच वसलेला असेल तर तो हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व शिख – सर्वातच समान वसलेला आहे. मग कोण्या धर्माचा किंवा मुस्लिमांचा द्वेष ख-या हिंदूला कसा संभव आहे?
सत्य ईश्वरस्वरुप आहे व अहिंसा हे सत्यापर्यंत पोचण्याचे शुध्द व नेमके साधन आहे. मग या दोघांचा सोयीस्कर स्वीकार व अस्वीकार कसा करता येईल ? सत्य, अहिंसा व सर्वत्र समभाव ही हिंदू, बौध्द व जैन धर्माची अबाध्य तत्वे आहेत. त्यांचा सौदा गांधीला शक्य नाही. संघाला ही तिन्ही तत्वे सोडता येतात.
गांधी व संघामधला हा मूलभूत तात्विक भेद सुदर्शनजींना लख्ख कळला होता. राजीव सानेंची बाह्य रुपावरुन गल्लत झाली.
काय भुललासी वरलीया रंगा ? – चोखामेळा.
—–xxx—-
दैनिक लोकसत्ता
2 ऑक्टोबर 2016
Comments